जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा -: भरघोस निधी देऊन देखील जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने आज ना. गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिका प्रशासन, सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रस्त्यांच्या ठेकेदाराला अक्षरश: धारेवर धरले. काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा त्यांनी दिला. यानंतर ठेकेदाराने उद्यापासून रस्त्याची कामे करण्याचे सांगितले. तर ना. गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत महापालिका प्रशासन आणि सार्वजनीक बांधकाम खात्याला गेल्या दोन वर्षात प्रदान केलेला निधी आणि याच्या माध्यमातून आजवर झालेली आणि रखडलेली कामे यांचा आढावा घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.
मंगळवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई, उपअभियंता गिरीश सुर्यवंशी यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते.
जळगाव शहरातील रस्त्यांची अगदी दयनीय अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना पावसाचे कारण मक्तेदाराकडून दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे अन्य भागातील व विशेष करून जळगाव व धरणगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे पावसाळ्यात देखील होत असताना जळगाव शहरातील रस्त्यांच्याच कामांना पावसाळ्याचा अडसर का ठरते आहे ? अशा शब्दात जळगाव शहरातील रखडलेल्या कामांवर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सा. बा. विभाग,मनपा व मक्तेदाराना धारेवर धरले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून २५० कामे मंजूर करण्यात आली असून या कामांपैकी १२४ पूर्ण झालेले असून उर्वरित रखडले आहेत. यासाठी डीपीडीसीमधून अडीच वर्षात यापैकी ८२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून यातील ६२ निधी वितरीत झालेले आहेत. मात्र असे असतांनाही जवळपास निम्मे काम अपूर्ण असल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तर, महापालिकेला मिळालेल्या ३८ कोटींच्या निधीपैकी १२ कोटी च्या निधीतून प्रमुख १० रस्त्यांच्या कामांना सुरुवात का झाली नाही? असा खडा सवाल ना. गुलाबराव पाटील यांनी केला. या कामांना सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, एकीकडे तालुक्यांमध्ये डांबरीकरणाचे कामे होत असताना, जळगाव शहरातच डांबरीकरणाच्या कामांना काय अडचण ? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
रस्त्यांची कामे होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत जात असून, केवळ विविध कारणं देवून कामांना उशीर करू नका. आता कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करा. तसेच वेळेवर काम करून घेण्याच्या सूचना देखील गुलाबराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. हे काम वेळेवर व्हावे यासाठी मक्तेदाराकडून स्टॅम्प भरून घेण्यात यावा तसेच मक्तेदाराने जर वेळेवर काम नाही केले तर मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्याही सूचना ना.गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, याप्रसंगी रस्त्याच्या ठेकेदाराने उद्यापासून काम सुरू करण्याचे सांगितले. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी कामे करतांना ती दर्जेदार व्हायला हवीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.