राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – एकनाथ शिंदे गट शिवसेना आपलीच असल्याचा दावा करत असून, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. याप्रकरणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाला प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वी शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.
येणाऱ्या काळात राज्यभरात विविध महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासोबतच अंधेरी पूर्व मुंबईचे आमदार रमेश लटके यांचेही निधन झाले आहे. त्यांच्या जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. यावेळी उमेदवार उभे करण्याबरोबरच त्यांच्या चिन्हावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी आयोगाचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काय आहे शिंदे गटाची याचिका ? :-
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये म्हणून शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्ष चिन्ह व इतर तांत्रिक बाबींचा निपटारा होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी. निवडणूक आयोगाने सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे.