राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका टिपण्णी केल्यामुळे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा गळा दाबिन असे विधान औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. राग आला तर काहीही करू शकतो, असेही खैरे म्हणाले, ठाकरे यांच्यावर नुकतीच गुलाबराव पाटील यांनी टीकाटिपण्णी केली होती. यावर खैरे संतापले आहेत. काहीही झाले तरी गुलाबरावांना माफी मागावीच लागेल, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.
शिवसेना कोणाची यावरून सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून आल्यावर दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे देत आहेत. शिवसेनाप्रमुख हे राष्ट्रपुरुष असल्याने त्यांची प्रतिमा किंवा विचार कोणत्याही एका कुटुंबाची मक्तेदारी होऊ शकत नाहीत, असा सवाल शिंदे गटाकडून केला जात आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिंदे गट देशद्रोही असल्याची टीका करत आहेत.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील ? :-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वारसा आदित्य ठाकरे यांच्याकडे असू शकतो, त्यांच्या विचारांचा नाही. त्यांनी बोलताना त्यांचे वयाचे भान ठेवावे. आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नका. अन्यथा आम्हाला बोलणे कठीण होईल, त्यांना आवरणे कठीण होईल, असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. उद्धव ठाकरेंना आमच्याशी बोलण्याचा अधिकार आहे, पण आदित्य ठाकरेंना आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका गुलाबराव यांनी केली होती.
खैरे यांच्या इशाऱ्याला गुलाबरावांचे उत्तर ;-
चंद्रकांत खैरे यांच्या या तिखट वक्तव्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची याप्रकरणी विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की चंद्रकांत खैरे यांना आपला गळा प्रिय का आहे, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे. खैरे यांनी आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले तर ते आम्हाला मिठी मारतील आणि गळ्यात गळे घालतील, असे उत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे असा सल्ला गुलाब राव यांनी दिला.