राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – तुम्हीही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल किंवा या सरकारी योजनेत नोंदणी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. पुढील महिन्यापासून सरकार या योजनेत मोठा बदल करणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ही योजना अनेक लोकांसाठी बंद करण्यात येत आहे, म्हणजेच आता देशातील अनेकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हा नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल :-
अटल पेन्शन योजनेच्या नवीन नियमांनुसार, आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. या सरकारी योजनेचा नवा नियम ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.
करदात्यांना 30 सप्टेंबरपर्यंत लाभ घेता येईल :-
अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील करदाते असाल आणि या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. पुढील महिन्यापासून तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही.30 सप्टेंबरपर्यंत करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
आधीच उघडलेली खाती सुरू राहतील :-
ज्यांनी आधीच खाते उघडले आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील. जर अटल पेन्शन योजना खाते 1 ऑक्टोबर नंतर उघडले असेल आणि ती व्यक्ती आधीच आयकर भरत असेल, तर त्याचे खाते बंद केले जाईल.
या सरकारी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो :-
18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तुम्हालाही पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यात खाते उघडू शकता. या व्यतिरिक्त, या योजनेमध्ये, तुम्हाला आयकर कलम 80CCD अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
इथून तुम्ही खाते उघडू शकता :-
केंद्र सरकारने याआधी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली होती, पण नंतर त्याची लोकप्रियता पाहता सरकारने ती 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील सर्वांसाठी खुली केली होती. या योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता.
4 कोटी लोक घेत आहेत योजनेचा लाभ :-
ही योजना (APY) आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. केवळ 6 वर्षात या योजनेचा सुमारे 4 कोटी लोकांना फायदा झाला आहे.