(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यातील भूजलपातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते.
ज्या ग्रामपंचयाती छतावरील पाण्याचे संकलन, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर याबाबतीत चांगले काम करतील अश्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती ना. पाटील यांनी दिली. गावपातळीवरील भूजल पुनर्भरणाच्या योजना राबविताना अभिसरण महत्वाचे आहे. या योजनेला महात्मा गांधी नरेगा, पाणी फाउंडेशन व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गती द्यावी अशी सूचना कृषिमंत्री तथा अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीचे सदस्य दादाजी भुसे यांनी केली. बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांचे संचलक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अटल भूजल योजनेचे सादरीकरण केले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्यसचिव डॉ. संजय चहांदे व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.