जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – लम्पी व्हायरसने देशभरात कहर मजवला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो प्राण्यांना व गुरढोरांना आपला जीव गमवावा लागत आहे. महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाने मंगळवारी सांगितले की, राज्यात लम्पी विषाणूमुळे ४३ गुरांचा मृत्यू झाला आहे. विभागाने सांगितले की, आतापर्यंत २१ जिल्हे व्हायरसने प्रभावित झाले आहेत. राज्य सरकारने राज्यभरातील गुरांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सध्या याचा दूध उत्पादन आणि वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही. ह्या रोगामुळे जळगाव जिल्ह्यात आता पर्यंत जवळ जवळ १७ गुरढोरं मृत्यू पावली आहे .
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये (लम्पि व्हायरस) ढेकूण त्वचारोगामुळे एकूण ४२ बाधित गुरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागानुसार रविवारपर्यंत जळगावात १७, अहमदनगरमध्ये १३, धुळ्यात १, अकोला १, पुणे ३, बुलढाणा ३, अमरावती ३ आणि वाशिममध्ये १ जनावरे दगावली आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल गावात ४ ऑगस्ट रोजी लंपीचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा विषाणू फक्त गाय आणि म्हशींमध्ये आढळून आला आहे. रोगाची लक्षणे नसलेल्या जनावरांचे दूध वापरल्याने मानवाला कोणताही धोका नाही. जनावरांचा हा आजार बरा होऊ शकतो, मात्र अशा जनावरांच्या दुधावर विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रविवारपर्यंत जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, येवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशीम, नाशिक आणि जालना या राज्यातील एकूण २८० गावांमध्ये गुरांना या व्हायरसची लागण झाली आहे.