जळगाव राजमुद्रा | राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर प्रथमच राज्याचे विरोधी पक्ष नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नेत्यांचे भाषण झाली खरी मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू होतात नियोजनाचा अभाव दिसून आला. एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वेळा लाईट गेल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले मात्र लाईट गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षाच्या समर्थनात व शिंदे गटाच्या विरोधात 50 खोक्यांच्या घोषणा देत संपूर्ण नाट्यगृह दलाणून सोडले. काही काळ हिरमोड झालेले कार्यकर्ते पुन्हा उत्साहात आल्याने त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च चमकवीत घोषणांनी वातावरणात उत्साह आणला.
अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्युत पुरवठ्याच्या झालेल्या लपंडावामुळे या घटनेची चांगली चर्चा रंगली आहे भर सभेत अंधार झाला. मात्र “एकच वादा अजित दादा..” घोषणा उत्साह पूर्ण वातावरणात देण्यात आल्या, काही वेळातच विद्युत पुरवठा खंडित झाला या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर खडसे यांनी आपल्या भाषणे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आणला, शेवटच्या कार्यकर्त्यापासून तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच पक्षांसाठी झोकून देण्याची गरज असून आगामी काळात संघर्ष मोठा आहे. यासाठी पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. नुसत्या घोषणा देऊन पक्ष वाढणार नाही, तर प्रत्यक्षात गाव पातळीवर संघटन वाढीसाठी काम करणे गरजेचे असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचा संघटन वाढीसाठी अनेक जणांनी कष्ट घेतले मात्र तरी देखील पाहिजे तेवढे यश आलेले नाही, मात्र आगामी काळात निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल तर येत्या दोन वर्षांमध्ये पक्ष संघटन मजबूत करणे गरजेचे असल्याचे खडसे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.