(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने बोलतांना खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीही दूर केलेला नाही. मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते, हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. तसेच, सुरुवातीच्या काळात शिवसेना ५ ते ६ महिन्यांत बंद होईल, असं म्हटलं जात होतं, असं देखील त्यांनी सांगितलं.
लोकं म्हणायचे की शिवसेना हि मुंबई-ठाणे पर्यंत मर्यादित राहील, मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. संजय राऊत यांनी शिवसेना हा देशाच्या राजकारणातला मोठा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत”, असं ते म्हणाले.