नांदेड : राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याचे भाकित केलं जात आहे. असे असताना ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मोठं विधान केले आहे. सरकार वाचविण्यासाठी भाजप जणू पर्यायी मार्गाच्या तयारीत असल्याचा सूचक इशारा मंत्री महाजन यांनी दिला आहे.
नांदेडमध्ये झालेल्या बैठकीत गिरीश महाजन म्हणाले, राज्यभरातले अनेक नेते भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत. संपर्कातही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी नावं कोट करणार नाही. फक्त या जिल्ह्यातलेच नाहीत. तर महाराष्ट्रातून अनेक लोकं, बडे मंडळी… आपल्या पक्षाचं भवितव्यं काय हे, ज्यांना कळतंय. त्यांना बऱ्याच जणांना भाजपात येण्याची इच्छा आहे.
काँग्रेसला खिंडार पडणार?
नांदेडमधील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. असे असताना गिरीश महाजन यांनी वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आल आहे. फक्त याच जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून नेते संपर्कात आहेत, असे म्हटल्याने भाजपा आता काँग्रेसला खिंडार पाडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.