मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार केव्हाही कोसळणार असल्याचे भाकीत केले होते. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
ठाकरे गटाच्या शिवसेनेची आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनी केल्या घोषणा
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांपर्यंत जा.. असे आदेश संपर्कप्रमुखांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडूनही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात, असंही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याचं समजतं.
काम घराघरात पोहचवा
राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.