जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुध्द तोफ डागली. विशेषत: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये शाब्दिक युध्द रंगले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेय. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे.
सुषमा अंधारेंच्या टीकांवर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील आक्रमक झाले. ते म्हणाले, थोडी फार उरलेली शिवसेना वाढवण्याचा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेरची भूत आणून शिवसेना वाढणार नाही. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांना लगावला आहे.
तर धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती
महाप्रबोधन यात्रेच्या शेवटच्या दिवशी मुक्ताईनगरातील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. यावरुन काल दिवसभर चांगलेच राजकीय नाट्य रंगले होते. सुषमा अंधारे यांची सभा होऊ न देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दबाव टाकला, असा आरोप झाला होता. यावर पाटील म्हणाले, “आम्ही दबाव टाकला असता तर सुषमा अंधारे यांची धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती. मुक्ताईनगरमध्ये माझी सभा होती. त्या सभेसाठी आम्ही आधी परवानगी मागितली होती आणि ती मिळाली सुद्धा होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती. त्यासाठी दोन्ही सभा रद्द केल्या. त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. परवानगी नाकारल्यानंतर सभा घेणारच असा इव्हेंट केला आणि मी कशी महाराणी आहे अस चित्र त्यांनी निर्माण केलं, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
यांना फक्त गुलाबरावच दिसतोय
राज्यात ४० आमदारांमध्ये यांना फक्त गुलाबराव पाटीलच दिसतोय. मात्र हा एकटा वाघ सर्वांना काफी आहे, माझी स्टाईल कॉपी करायला सुषमा अंधारेंना अनेक जन्म घ्यावं लागतील, सुषमा अंधारे बाई आहेत. माणूस असता तर दाखवलं असतं गुलाबराव पाटील कोण आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला.