पाचोरा : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका कापड दुकानास आग लागल्याची घटना आज (दि. ६) पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील बस स्थानक रोडवर गणेश प्लाझा व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलात राहुल मोरे यांचे मुद्रा एन. एक्स. या नावाचे कापड दुकान आहे. या दुकानात दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर रेडिमेड कापड विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र, पहाटेच्या सुमारास दुकानात आग लागल्याने आतून धुर येत असल्याचे तेथुन जाणाऱ्या नागरिकास दिसून आले. संबंधित व्यक्तीने तात्काळ दुकानाचे मालक राहुल मोरे यांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दलास घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने महागडे कापड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे जवळपास ६० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.