मुंबई: संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. त्या 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला 12 हजार 776 मते पडली.
निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे. मला या निवडणुकीत विजय मिळाला असला तरी कोणत्या प्रकारचा जल्लोष केला जाणार नाही. कारण पतीच्या दुर्दैवी निधनानंतर मला निवडणूक लढवावी लागली होती,’ असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
नोटाला मिळालेली मते भाजपची
यासोबतच निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना त्यांनी “नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी (भाजपाने) जरी उमेदवारी मागे घेतली होती, तरी भाजपकडून नोटाला मतदान करण्याचे लोकांना सांगितले जात होतं. याबाबत आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत नोटाला जी मते मिळाली आहेत, ती सर्व भाजपची मते आहेत. आपल्याला या निवडणुकीत एवढीच मते मिळणार आहेत, हा अंदाज आल्यानेच भाजप उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. कारण यासंदर्भात त्यांनी एक सर्व्हेदेखील केला होता. त्यांना जर खरंच माझ्याबाबत सहानुभूती असती तर त्यांनी आधी अर्जच भरला नसता, असा घणाघात ऋतुजा लटके यांनी केला आहे.