अॅडलेड : भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगला देशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत आपली गादी पुन्हा मिळवली. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव 115 धावात गुंडाळला. यामुळे भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश झाला आहे.
सूर्यकुमार यादवची दमदार खेळी आणि भारतीय गोलंदाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि के.एल.राहुलने दमदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूमध्ये 61 धावा फटकावल्या तर के.एल. राहुलने 35 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वे समोर 187 धावांचे आव्हान दिले.
झिम्बाब्वे संघाच्या 115 धावा
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 115 धावाच करू शकला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने 4 षटकांमध्ये 22 देत 3 विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून रेयान बर्ल आणि रजा सिकंदर शिवाय कोणीही उभे राहु शकले नाही. रेयान बर्लने 22 चेंडूमध्ये 35 धावा केल्या तर रजा सिकंदरने 24 चेंडूमध्ये 34 धावा फटकावल्या. तर गोलंदाजांमध्ये शॉन विलियम्स रिचर्ड नगारवा यांना प्रत्येकी 2 विकेट पटकावण्यात यश आले.