जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना ‘नटी’ म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. बेताल वक्तव्य करणा-या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला.
शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील पक्षाच्या कार्यालयापासून महापालिका इमारतीसमोरून निदर्शन करीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महापौर जयश्री महाजन, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पाचोरा येथील पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, मंगला बारी, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांच्यासह पक्षासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
शहर पोलीस ठाण्यात धडक
मोर्चा महापालिकेमार्गे शहर पोलीस ठाण्यात धडकला. मोर्चेकऱ्यांनी केलेल्या विविध घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. सहसंपर्कप्रमुख वाघ, जिल्हा संघटक मालपुरे यांनी, जसा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्याप्रमाणे जळगावमध्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांविरुद्ध गुन्हा करण्याच्या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारेंच्या या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. “ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणले”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती.