मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस शिपाई भरतीला प्रशासकीय कारणामुळे स्थगिती देण्यात आल्याने इच्छूक तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट आली आहे. भरती प्रक्रियेतील अडचणीचा तांत्रिक मुद्दा दूर झाल्याने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील अनेक वर्तमान पत्रांमध्ये या संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डीजी ऑफिसमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पदभरतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या उमेदवारांनाही मिळणार संधी
राज्यात कोरोनामुळे 2 वर्षे शासकीय नोकरभरती काढता आली नाही. शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना प्रवर्गनिहाय वयाची अट असते. मात्र कोरोनात तरुणांच्या वयात 2 वर्षांनी वाढ झाली. त्यामुळे काही तरुण हे आपोआप या नोकरीच्या स्पर्धेतून बाद झाले. यामुळे नोकरभरतीत वयाच्या अटीत 2 ते 3 वर्षांनी वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
वयोमर्यादेत शिथिलता
असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत, त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे.