मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी 24 तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केली. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. यावरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजकारण हा भिकार धंदा
सुप्रिया सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?
राष्ट्रवादीनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तारांची मस्ती अतरवू, आम्हालाही बोलता येत पण, आम्ही तसं बोलणार नाही. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु, असे मिटकरी म्हणाले. राष्ट्रवादीकडून त्यांना शब्द मागे घेण्यासाठी 24 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.