जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, १० डिसेंबर रोजी मतदान होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसची महाविकास आघाडी, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत लढत होण्याची शक्यता असून, दोन्हींकडून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळातील २० संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. यासाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजवर सहकारात प्रवेश केला नव्हता. मात्र, आता त्यांनी दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या वतीने प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. दूध संघातील राजकारण आधीच तापले असून आता स्वत: पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानं रणधुमाळीला वेग येणार आहे.
खडसेंसमोर सत्ता राखण्याचे आव्हान
जळगाव जिल्हा दूध संघावर मागील सहा वर्षांपासून आमदार एकनाथ खडसे गटाचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र शिंदे सरकार आल्यानंतर जळगाव दूध संघात अपहार आणि चोरीच्या घटनांबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून दोघा मंत्र्यांचा कस लागणार आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीही मैदानात उतरणार आहे. तर महाविकास आघाडीचे नेतृत्व खडसे यांच्याकडेच असणार आहे. त्यामुळे ही सत्ता राखण्याचे मोठे आव्हान एकनाथ खडसे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापणार आहे.