मुंबई : शिंदे गटाचे नेते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. सत्तार यांनी अत्यंत गलिच्छ भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते भडकले असून, अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसून तोडफोड केली आहे. मात्र, अब्दुल सत्तार का भडकले? यामागील कारण जाणून घेणे महत्वाचे आहे.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे गंभीर पडसाद उमटल्याचे पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने राज्यभरात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जात आहे. या सगळ्या गदारोळाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या महिला आयोगाने देखील घेतली आहे. हे प्रकरण चिघळण्यामागे सत्तार यांची टीका करताना जीभ घसरली हेच कारण आहे. पण सत्तार सुप्रिया सुळेंवर इतके का चिडले? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे
साडे तीन महिन्यात इडी सरकार आले, तेव्हापासून 50 खोक्यांबाबत चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. गावा-गावातही विचारले जात आहे की, ताई ते पन्नास खोक्यांचे काय झाले? पण मी म्हणते मला त्याबद्दल काय माहिती? इडी सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यानेही म्हटले की, 50 खोके हवे का? जर मंत्री ऑफर देत असेल तर काही तरी सत्य असेल ना असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते.
कोणी म्हटलंच नाही खोके घेतले नाहीत
तसेच 50 खोक्यांचा आरोप केला जातोय. पण त्यावर कोणी म्हटलंच नाही की घेतले नाहीत. एकही जण अजूनपर्यंत घेतले नाही म्हटलं नाही. मला जर कोणी म्हटलं असेल की सुप्रिया सुळे तुम्ही पक्क केलं तर मी नोटीस पाठवेन. आशिष देशमुख नोटीस तयार करा आणि पाठवा. मी कुणाचे 50 खोके घेतले नाहीत, अशी टीका सुप्रिया यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेवरच अब्दुल सत्तार यांना आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा त्यांची जीभ घसरली. त्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापलंय.