पुणे : 7 वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये गेला होता. यावेळी दुकानातील कामगारानेच मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे. सज्जन सहेआलम सलमानी (वय 20 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी कामगाराला अटक करण्यात आली आहे. या मुलाची आई त्याला केस कापण्यासाठी दुकानात घेऊन गेली होती. मात्र दुकानात गर्दी असल्याने मुलास दुकानात सोडून घरी परतली. दुकानातील गर्दी कमी झाल्यानंतर संबंधित कामगाराने या मुलाला आतील खोलीत नेले. त्याठिकाणी अश्लिल चाळे करून अनैसर्गिक कृत्य केले. तर ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
आरोपीस पोलिसांनी केली अटक
घाबरलेल्या स्थितीत मुलगा घरी गेला असता त्याने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात संबंधित कामगाराविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी सज्जन सलमानी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.