मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.
जामिनास ईडीने केला विरोध
न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ईडीकडून अटर्नी जनरल अनिल सिंह यांनी जोरदार युक्तिवाद करून राऊत यांचा जामीन अंमलबजावणी कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली. अपील करण्यासाठी कालावधी मागितला. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा दाखला दिला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ईडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडी या प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये जाणार आहे.