(राजमुद्रा, जळगाव) जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यासाठी दहा कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना प्रशासनाकडून मान्यता दिली असून जळगाव जिल्ह्यासाठी 8 अग्निशमन गाड्यांच्या खरेदीस 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठ शहरांमध्ये एकूण बारा कोटींची नाविन्यपूर्ण कामे होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
खासदार, आमदार तथा लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य संस्थांना बळकट अग्निशमन सुविधा मिळावी या उद्देशाने 2 कोटी 31 लाखांचा निधी लहान स्वरूपाच्या अग्निशमन गाड्यांच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मंजूर केला आहे.
सदर नाविन्यपूर्ण कामे जामनेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, पारोळा, भडगाव, धरणगाव आणि शेंदुर्णी या आठ शहरांमध्ये होणार असून यात डिजिटल दवंडी सायरन, अभ्यासिकांचे बांधकाम, स्मशानभूमी, शेव पेट्या, महिला बचत गटासाठी सभागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट, रस्ते तथा नदी नाल्यांवर संरक्षक भिंती, गावहाळ, खुल्या व्यायाम शाळा, लोखंडी बाक तसेच सार्वजनिक शौचालये यांचा समावेश असणार आहे.