मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत आज अखेर तीन महिन्यांनी जेलमधून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी ईडीने त्यांना गेल्या तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. अखेर 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता झाली आहे. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. तर ऑर्थर रोड कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी दिवाळी साजरी केली.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं पाहायला मिळालं. पूर्वीच्याच जोशात संजय राऊतांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले. आम्ही लढणारे आहोत, लढतच राहू, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. आर्थर रोड तुरुंग परिसरात संजय राऊत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.
संजय राऊत काय म्हणाले?
आलोय बाहेर, बघू आता. अटक बेकायदेशीर होती हे न्यायालय म्हणतंय तर ते खरंच असणार, असंही ते म्हणाले. तसेच, आम्ही लढणारे आहोत, लढतच राहू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला. तसेच, पुढे कार्यकर्त्यांनी जो कार्यक्रम आखला आहे त्यानुसार जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई हायकोर्टाची ईडीला चपराक
पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. पण या जामीनाविरोधात ईडीने पुन्हा हायकोर्टात अपील केलं. मात्र यावेळी मुंबई हायकोर्टाने ईडीला चांगलंच झापलं. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली. याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या लगोलग अपील करण्याने आम्ही काही क्षणांत राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, असे सांगतानाच मुंबई हायकोर्टाने ईडीला जोरदार चपराक लगावली.