मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते 103 दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून सरकार तेच चालवत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारने काही निर्णय चांगले घेतले असून विरोधाला विरोध करणार नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
त्यांच्या आनंदात मीही सहभागी
तुरुंगात राहणं काही सोपं नसतं. जेलमध्ये लोक मजेत राहत असं वाटत असेल तर तसं नाही. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे दिवस खूप खडतर गेले आहेत. मला वाटलं तीन महिन्यांनी लोक मला विसरतील, पण लोकांचं प्रेम काल आपण पाहिलं. गेल्या तीन महिन्यांत माझ्या कुटुंबानं खूप काही गमावलं आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानं मोठा संदेश देशात गेला आहे. आपला देश 150 वर्ष गुलामीत होता तेव्हा देखील अस राजकीय वैमनस्य नव्हतं. तुरुंगात तुम्हाला भितींशी संवाद साधायला लागतो. एकाकीपणा खायला उठतो. ज्यांनी माझ्या अटकेचं षडयंत्र रचलं होतं त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यात सहभागी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंना लगावला टोला
संजय राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी मला तुरुंगात जावं लागेल असं म्हटलं होतं आणि एकांतात स्वत:शीच बोलायची प्रॅक्टीस करा असाही सल्ला दिला होता. आज मी सांगतो होय मी एकांतात संवाद साधला. कारण सावरकरही एकांतात होते. लोकमान्य टिळकही एकांतात होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. माझीही अटक राजकीय होती हे आता कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.