मुंबई : हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका प्रेक्षकाला काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि आव्हाड यांनी त्याची सुटका केली, असे सीसीटीव्हीमध्ये दिसत असताना आज (दि.11) ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलावून यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये राडा रंगला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह 100 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी आव्हाड यांच्यासह 12 जणांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज दुपारी वर्तकनगर पोलिसांनी त्यांना फोन करून पोलीस ठाण्यात येता की, पोलीस घरी पाठवू, असे बजावले. त्यानंतर आव्हाड हे दुपारी एक वाजता वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.
कारवाई वरिष्ठांच्या दबावातून- आव्हाड
ही कारवाई वरून आलेल्या दबावामुळे होत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितल्याचा दावा माजी मंत्री आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये केला आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.