जळगाव : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची कारागृहातून नुकतीच सुटका झाली. यानंतर ते आता पक्षाच्या कामकाजात सक्रीय होत आहेत. लवकरच ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा जिल्ह्यातील वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे नुकत्याच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेऊन शिंदे गटाला हादरे दिले होते. आता शिवसेनेचे फायरब्रॅंण्ड नेते खा. संजय राऊत यांची ईडीच्या कारागृहातून नुकतीच सुटका झाली आहे. यानंतर ते राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ते जळगाव जिल्ह्यातून करणार असल्याचे म्हटले जात आहे.
संजय सावंतांनी केली होती घोषणा
नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या तालुका निहाय बैठकीमध्ये संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील याबाबतची घोषणा केली होती. त्यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणावे होते की, खा. संजय राऊत कारागृहातून बाहेर आल्यावर धरणगाव येथे सभा घेतील. यामुळे आता संजय राऊत लवकरच धरणगाव मध्ये सभा घेतील. असे म्हटले जात आहे.