जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक १४ जून,२०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. सदर कार्यप्रणाली मध्ये महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी मा. परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्य आहेत. तशा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत व व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे.
नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर आज अखेर राज्यात १६९२० शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे ४०० नविन वाहन नोंदणी करण्यात आलेली आहे. सदर लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा यशस्थिती करण्यात येत आहेत. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्यात यईल याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा, कलम १९(इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल अशा प्रकारची कारवाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेमार्फत करण्यात येईल.
त्याचबरोबर जी महा ई–सेवा केंद्र,मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थांविरुध्द पोलीस कारवाई तर केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
शिकाउ अनुज्ञप्ती नागरिकांनी घरबसल्या काढण्याबाबतीची शासनाची सदर योजना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून याकामी हेतूपुरस्कार दिशाभूल करुन नागरिकांना आधारकार्डच्या आधारे बेकायदेशिरपणे शिकाऊ अनुज्ञप्ती काढून देणाऱ्या विरुध्द आवश्यक ती कारवाई करणेसाठी नागरिकांनी सजग राहून या कार्यालयास सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.