मुंबई : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील 910 पदे लवकरच भरली जाणार आहेत.
अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता 3,500 असून, 910 कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. याशिवाय चालकांची क्षमताही कमी असून, 56 चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकेने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे. संधी मिळणाऱ्या जवानांना 30 हजारांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.
कशी होणार निवड प्रक्रिया?
भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर गुणवत्तेनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी 800 मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रस्सीद्वारे चढणे आदी चाचण्या होणार आहेत. यात अवजड वाहनांच्या वाहतूक लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.
महिलांसाठी 30 टक्के आरक्षण
भरतीमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण असून उमेदवार पात्र न ठरल्यास पुरुष गटातून पात्र उमेदवारांची भरती होणार आहे. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण होणार आहे.