जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मध्यप्रदेश सीमेलगत गुरांची अवैधरित्या वाहतूक केली जाते. यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही, गुरांची निर्दयीपणे होणारी वाहतूक थांबताना दिसून येत नाही. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावदा फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान एका ट्रकमध्ये ४० गोवंश प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून ४० गुरांची गोशाळेत रवानगी केली आहे.
सावदा येथील फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान एम.पी.०४.जी.बी.९२९१ या ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंश असणाऱ्या गुरांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी सदर ट्रक अडवून तपासणी केली. ट्रकमध्ये ४० गोवंश निर्दयपणे कोंडून त्यांची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ट्रक सावदा येथे आणून त्यातील गोवंश हे गोशाळेत रवाना करण्यात येऊन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक मसुद बेग मतलब बेग (वय-२७, रा. उत्तर प्रदेश) यास अटक केली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे पो.ना. यशवंत रमेश टहाकळे यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात २ लाख २७ हजार किंमतीची एकुण ४० गुरे तसेच १२ लाख किंमतीचा एक मालवाहु अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक असा एकूण १४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील व सहकारी करीत आहे.