मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 15 जणांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केले आहे. काल आव्हाड यांना ठाणे येथील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यांना आज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर आव्हाड यांच्या वकीलांनी त्यांना जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आव्हाड यांच्यासह 15 जणांना अटी-शर्तींसह जामीनाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात त्यांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने त्यांना घालती असून त्यानंतरच जामीन मंजूर झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.