जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज भरले गेले असून आता माघारीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप -शिवसेना शिंदेगट युती अशी लढत होणार आहे.
जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा दूध संघावर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या संचालक मंडळाची सत्ता होती. यापूर्वी ही निवडणूक सर्वपक्षीय झाली होती. आताही ही निवडणूक सर्वपक्षीय होईल, अशी चर्चा होती. मात्र आता निवडणूक एकनाथ खडसे विरुद्ध भाजप असं चित्र दिसून येत आहे. खडसेंना शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा दूध संघात गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सत्ताधाऱ्यांकडून नियमांची मोडतोडीचा आरोप
एकनाथ खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. दुसरीकडे मातब्बर नेते समजले जाणारे तसेच अनेक वर्षांपासून जिल्हा दूध संघावर मजबूत पकड असलेल्या खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट म्हणजेच मंत्री गिरीश महाजनांकडून डावपेच आखले जात आहे. सत्ताधारी राजकीय दबावाचा वापर करून नियमांची मोडतोड करीत आहेत. तालुका मतदारसंघाच्या यादीत असलेल्या उमेदवाराला त्याच तालुक्यात उमेदवारी करण्याचा नियम होता. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. आमदार मंगेश चव्हण यांचा मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
रस्त्यांवरुन दोघा मंत्र्यांवर टीका
जळगाव शहरातील नादुरूस्त रस्त्यांसाठी एकनाथ खडसे हे रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. एकनाथ खडसेंनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी केली. डांबर न टाकता रस्त्यांची कामं होत असून यावरुन एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त करत या निष्कृष्ट कामांना विद्यमान जबाबदार असल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी नाव न घेता सत्ताधारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याच बगलबच्च्यांना कंत्राट देवून सत्ताधारी मंत्री विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही यावेळी एकनाथ खडसेंनी केला.
महाजन-पाटलांचा पलटवार..
यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. त्यांना आता भरपूर वेळ आहे. म्हणून ते रोज बोलत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम त्यांनी करत राहावं. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल”. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आधीच्या सरकारने ४२ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. ती आम्ही उठवली आहे. एएनओसी मिळत नसल्यानं रस्त्यांची कामं थांबली होती. मात्र, आता ही कामं सुरू झाली आहेत. खडसेंनी आजपर्यंत काही केलं नाही. त्यामुळे मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
सत्ता कुणाची येणार?
एकूणच दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून राजकारण तापले आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चुरस पहायला मिळते आहे. महाजनांचे डावपेच यशस्वी होवून जिल्हा दूध संघावर सत्ता परिवर्तन होवून भाजप व शिंदे गटाची सत्ता येणार की, मातब्बर नेते एकनाथ खडसे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर जिल्हा दूध संघावर पुन्हा सत्ता मिळवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.