मुंबई : ठाकरे गटात नाराज असलेल्या दिपाली सय्यद गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. तरीही प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंध यामुळे ताणले जातील. त्यामुळे दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी दिपाली सय्यद यांनी प्रयत्न केले. प्रयत्न असफल ठरल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी आजवर किमान चार ते पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
आजचा प्रवेशही बारगळला
9 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षप्रवेश पुढे ढकलत रविवारी 13 नोव्हेंबरला ठेवण्यात आला. सुरुवातीला पक्षप्रवेशाचे ठिकाण वर्षा निवासस्थान ठेवण्यात आले. रात्री ऐनवेळी या ठिकाणात बदल करत ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी प्रवेश करणार असल्याचे दीपाली सय्यद यांच्याकडून सांगण्यात आले. दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली. मात्र आजचा प्रवेश ही पुढे ढकलण्यात आला आहे.
आधी जाहीर माफी मागावी
भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं मृणाल पेंडसे यांनी सांगितलं. मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तीला खरंतर प्रवेशच देऊ नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत, असंही त्या म्हणाल्या. भाजपच्या या मागणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.