चंदीगड : असे म्हटले जाते की, प्रेमाला जात-धर्म, वयाच्या सीमा दिसत नाहीत. असाच एक प्रकार पंजाबमधून समोर आला आहे. बेल्जियम येथील तरुणीची फेसबुकवर एका पंजाबी तरुणाशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आपले प्रेम मिळवण्यासाठी ती पंजाबमध्ये आली. त्यानंतर तिने आपला देश आणि धर्माचा त्याग करुन पंजाबी तरुणाशी विवाहबध्द झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेल्जियमच्या तरुणीने कपूरथलाच्या सिंधवा डोना गावातील निहंग युवक झैल सिंहसोबत फेसबुकवर मैत्री केली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि जवळीक इतकी वाढली की हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. या तरुणीने आपले प्रेम मिळविण्यासाठी पंजाबमध्ये येऊन शीख धर्म स्विकारला. विशेष म्हणजे आपले नावही बदलून जगदीप कौर ठेवले. यानंतर या दोघांचा शीख रितीरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पडला.
जगदीप कौर शिकतेय पंजाबी भाषा
जगदीप कौर 8 महिन्यांपूर्वी देश आणि धर्माची सर्व बंधने झुगारून कपूरथळाला पोहोचली होती. यानंतर तिचे आणि निहंग झैल सिंगचे लग्न झाले. जगदीप कौरने केवळ लग्नच केले नाही तर प्रथेप्रमाणे अमृतपान करुन शीख धर्म स्वीकारला. जेव्हा दोघांनी सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा बेर साहिब येथे नतमस्तक झाले तेव्हा भाविक त्यांच्यासोबत सेल्फी घेतानाही दिसले. निहंग झैल सिंहने सांगितले की, त्याची बेल्जियमच्या रहिवासी जगदीप कौरशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली, परंतु जगदीपला पूर्वी पंजाबी भाषा समजत नव्हती. तिला फक्त इंग्रजी समजते, पण फेसबुकवर चॅटिंग करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सुमारे 8 महिन्यांपूर्वी जगदीप बेल्जियमहून कपूरथला येथे आली होती. यानंतर त्यांनी गुरुग्रंथ साहिबच्या साक्षीने विवाह करुन, आता ते एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. जगदीप आता पंजाबी भाषा आणि तेथील रितीरिवाज शिकत आहे.