मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक नवी खेळी खेळली जात आहे. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला मुलूख मैदानी तोफ भेटली. सुषमा अंधारे यांनी संधी साधत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताच अंधारे यांना पक्षाच्या उपनेत्या हे पद देण्यात आलं. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना एकनाथ शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे.
वाघमारे यांना मोठी जबाबदारी देणार
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे, हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं आता अंधारेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद मठात वैजनाथ वाघमारे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येवू शकते. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या आक्रमकतेवर गदा येणार का असा प्रश्न पडू लागला आहे.
सुषमा अंधारे यांच्यासोबत मतभेद नाही- वाघमारे
वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारणही स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे मी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ भाईंचे विचार आवडले. एकनाथ शिंदे यांचा विद्रोही. क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.