जळगाव शहरात खड्ड्यांच्या झालेल्या समस्येवर गिरीश महाजनांवर साधला निशाना
जळगाव राजमुद्रा (कमलेश देवरे ) | राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे अचानकच जळगाव शहरात सक्रिय झाल्याने अनेकांचे डोळे चक्रावले आहेत दूध संघ तसेच जमीन घोटाळ्यात विविध चौकशी सुरू असताना खडसे यांनी विरोधकांसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे.
आतापर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाजप मध्ये असताना खडसे हे हुकूमी एक्का म्हणून बघितले जात होते, मात्र अंतर्गत राजकारणाचे बळी पडलेल्या एकनाथराव खडसेंना भाजपमधूनच मंत्री गिरीश महाजन हे पर्याय म्हणून आव्हान देण्यासाठी उभे राहिले, त्याचा राष्ट्रवादी प्रवेशा नंतर मिळालेली आमदारकी अनेक संकेत देणारी ठरली, पण राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर यंत्रणांचा फास खडसे यांच्या भोवती अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले.
भोसरी जमीन घोटाळा याची पुन्हा सुरू झालेले चौकशी दूध संघात झालेला अपहार असे विविध ठपके ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे. मात्र न्याय पालिकेचा आधार घेऊन खडसे होणारे हल्ले परतावून लावताना दिसून येत आहे.
नुकतीच दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या खडसे व महाजन गटाच्या माध्यमातून सुरू आहे. यातच गेल्या महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एका वर्षात जळगाव शहराचा कायापालट करू हेच वाक्य लक्षात घेऊन खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
जळगाव शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना ही समस्या जीवावर बेतणारी ठरत आहे. एकनाथराव खडसे यांनी याला सर्वश्रुत कारणीभूत गिरीश महाजन असल्याचे खडसे हे सांगायला विसरलेले नाहीत. वर्षभरात कायापालट करणार असे सांगितले असल्यावर देखील समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहेत नेमका हाच कळीचा मुद्दा घेऊन खडसे यांनी जळगाव शहर गाठले आहे. सत्तेत असणाऱ्या गिरीश महाजन यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आव्हान निर्माण करण्यासाठी खडसे यांनी देखील कंबर कसली आहे.
शहरातील कोर्ट चौक परिसरातील रस्त्याची झालेले दुरवस्था व रस्त्यामधून झालेला भ्रष्टाचार खडसेंनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खड्डे खोदून उकरून काढला आहे. वर्षाभरापूर्वी केलेला रस्ता त्यावर पुन्हा पाच कोटी दुरुस्तीसाठी मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार खडसे यांनी चव्हाट्यावर आणला आहे. यामुळे अवघ्या वर्षभर बाकी असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा शड्डू आजच खडसे यांनी जाहीरपणे ठोकलेला दिसून येतो.
जळगाव शहराच्या झालेल्या अवस्थेला गिरीश महाजन जबाबदार असल्याचा ठपका एकनाथराव खडसे यांनी ठेवला आहे. महाजन यांच्या बगलबच्चांनाच ठेके देण्यात आल्याचे खडसे यांनी आरोप केला आहे. खड्डे हा कडीचा मुद्दा बनत असताना माजी मंत्री सुरेश जैन यांचे कौतुक करताना ते विसरलेले नाहीत हे विशेष आहे. यामुळे आगामी राजकारण आ. खडसें विरुद्ध मंत्री महाजन असेच रंगताना पाहायला मिळणार आहे. कारण यामध्ये राष्ट्रवादी पेक्षा खडसे सेना अधिक सक्रिय झाल्याचे स्पष्ट आहे.