मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यानी मला न्याय द्यावा, अशी मागणी महिलेनं केली आहे.
आव्हाड यांनी काय म्हटलंय?
या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही कलम 354, मी या पोलीसी अत्याचाराविरुद्ध लढणार…मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या…उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या 40 वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.