चाळीसगाव : शहरातील शास्त्री नगर, योगेश कॉलनीतील रहिवासी असलेल्या शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ११ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबवला. शहरात बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर, योगेश कॉलनीतील रहिवासी व जिल्हा परीषद शाळेचे दत्तात्रय भिला मालपुरे (वय ५२) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मालपूरे कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील लॉकरमधून सव्वा लाखांची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगल पोत, दोन लाख ७५ हजार रुपये किंमतीची ५५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, एक लाख रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, एक लाख रुपये किंमतीच्या २० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, दिड लाख रुपये किंमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, सव्वा लाखांच्या २४ सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे २ झुमके, सव्वा लाखांचा २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १२ हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमचे पेंडल, १२ हजार किंमतीची तीन ग्रॅमची सोन्याची नथ, २५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याचा तुकडा, ३० हजार रुपये किंमतीची सहा ग्रॅमची सोन्याची चैन असा एकूण ११ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.
गावाहून आले असता चोरीची घटना उघड
मालपूरे कुटुंब शनिवार, १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तातडीने चाळीसगाव शहर पोलिसांना सूचित करण्यात आले. तपास सुहास आव्हाड करीत आहेत.