पुणे : विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यायचं नाटक असून ही सर्व स्टंटबाजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन करा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
पुण्यात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांमार्फत आव्हाड यांच्यावर 354 चा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत.
आव्हाड नौटंकी करताय- बावनकुळे
जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलं आहे. मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. हि्ंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी व्हिडिओ पहावा
72 तासांच्या सर्व गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यानुसारच हे गुन्हे दाखल झाले आहे. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाहीत, देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांनी व्हिडिओ पहावा आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावं, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.