नवी दिल्ली: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 787 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांची भरती केली जाणार आहे. सीआयएसएफने कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी सीआयएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी आणि उत्तम पगारही मिळणार असेल. सीआयएसएफ कॉन्स्टेबल वॅकेन्सी 2022 चा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.
अधिसूचनेनुसार, स्वयंपाकी, मोची, शिंपी, न्हावी, धोबी, सफाई कामगार, पेंटर, गवंडी, प्लंबर, माळी, वेल्डर आणि हवालदार आणि न्हावी अशा एकूण 787 पदांची भरती केली जाणार आहे. एकूण घोषित पदांपैकी 69 महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर 641 पुरुष उमेदवारांसाठी आणि 77 माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
21 नोव्हेंबरपासून अर्ज भरा
इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF द्वारे जाहिरात केलेल्या कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी अधिकृत भर्ती पोर्टल, cisfrectt.in वर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि उमेदवार 20 डिसेंबर 2022 पर्यंत शेवटची मुदत आहे.
फी किती लागणार?
अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 100 रुपये विहित शुल्क भरावे लागेल. तथापि, SC, ST आणि ESM उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही कारण त्यांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सूट देण्यात आली आहे.
पगार :
ही केंद्र सरकारची नोकरी आहे. त्यामुळे केंद्रीय वेतनश्रेणीनुसार पगारही मिळणार आहे. प्रारंभिक वेतनश्रेणी 3 अंतर्गत, सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबलच्या पदांसाठी निवडलेल्या तरुणांना प्रति महिना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना दिले जातील. याशिवाय इतर सर्व भत्त्यांसह पूर्ण वेतन मिळणार आहे.
कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरतीसाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असावेत.
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
उंची: पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेमी असावी. महिलांसाठी किमान उंची 155 सेमी आहे.