मुंबई: समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्दचे आमदार अबू आझमी यांच्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील 30 हून अधिक ठिकाण्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.
व्यवसायांमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला असून काही महिन्यांपूर्वीपासून आयकर विभागाची नजर होती. मुंबईसह राज्यभरात, लखनऊसह उत्तर प्रदेशमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान, अबु आझमी अमरावती, अकोल्याच्या दौऱ्यावर होते. तेथील सर्व कार्यक्रम रद्द करून ते सकाळी मुंबईला पोहोचले आहेत. मला याबाबत काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी दिली आहे.
आभा गुप्तांच्या घरावरही छापे
अबू आझमी यांचे निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या घरावरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. हे छापे बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित आरोपांशी संबंधित आहेत. अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. तर आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, जे अबू आझमीचे निकटवर्तीय आणि सपाचे सरचिटणीस होते. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. आभा गुप्ता यांच्या कंपन्यांच्या जागेवरही हे छापे टाकण्यात आले आहेत.
मुंबईतही कारवाई
कुलाब्यातील कमल मॅन्शनवरही आयटीने छापा टाकला आहे. आभा गुप्ता आणि अबू आझमी यांची कार्यालये येथे आहेत. याशिवाय मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ येथे छापे टाकण्यात आले आहेत. वाराणसीतील विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या आवारात छापा टाकण्यात आला. आभा गुप्ता यांनी कंपनीत मोठी बेनामी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुपही आयटीच्या रडारवर आहे. आयटीने कोलकाता येथील हवाला व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत.