जळगाव: भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली आहे. ही दुर्घटना आज (दि. १५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. यात तरुणीचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक ( एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनीकडून रेल्वे उड्डाणपुराकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (वय-२० रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५, रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे.
पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील तरुणीचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून, याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कॉलेजमधून घरी जाताना काळाने घातली झडप
मनस्विनी हिला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी वडिलांनी केला होता. आग्रह मात्र भावाच्या गाडीवर जाते असे सांगून ती कॉलेजमध्ये गेली. कॉलेजमधील कामे उरकवून घरी जाण्यासाठी आपल्या भावाला पुन्हा बोलून घेतले. मात्र त्यानंतर घरी जात असताना शिव कॉलनीवरील उड्डाणपुलाजवळ अंगावरून डंपर गेल्याने मनस्विनी जागीच गतप्राण झाली. यामध्ये भाऊ नचिकेत हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. मात्र डोळ्यात देखत आपल्या बहिणीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहताना नचिकेत प्रचंड धास्तावला होता.
सीए होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
मनस्विनी उर्फ स्नेहल सुभाष सोनवणे असे मयत तरुणीचे पूर्ण नाव असून, प्रचंड अभ्यासू म्हणून तिची ओळख होती. शहरातील आयएमआर कॉलेजला सध्या शिक्षण सुरू होते, ती सीएच्या तिसऱ्या वर्षाला होती. मनस्विनी ही राज्यभर गाजलेल्या गर्जना संघटनेचे प्रमुख सुभाष सोनवणे यांची मुलगी तर भाजप नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांची बहिण होती. सोनवणे परिवाराचा जळगाव शहरात मोठा गोतावळा असून, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक पदाधिकारी उपस्थित झाले होते.