जळगाव: येथील आयएमआर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली मनस्विनी सोनवणे (वय-२० रा.खोटे नगर, जळगाव) हिचे अपघातात निधन झाले. प्रचंड अभ्यासू असलेली मनस्विनी सीएच्या तिसऱ्या वर्षाला होती. सीए होण्यासाठी तिनं खूप मेहनत घेऊन आपल्या परिवाराचा नावलौकिक उंचावण्याचा चंग बांधला होता. मात्र, नियतीच्या गर्भात काही वेगळेच दडलेलं होतं. कॉलेजमधून भावाच्या गाडीवर घरी जाताना डंपरने दिलेल्या धडकेत मनस्विनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मनस्विनी ही शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राज्यभर गाजलेल्या गर्जना संघटनेचे प्रमुख सुभाष सोनवणे यांची मुलगी तर भाजप नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांची बहिण होती. मनस्विनी ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. आपल्या मुलीची जिद्द आणि अभ्यासातील प्रगती लक्षात घेता, सीए परीक्षेच्या तयारीला परिवारातूनच प्रोत्साहन मिळाले. आज कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली असता, वडिलांनी आग्रह केला होता. मात्र भावाच्या गाडीवर जाते असे सांगून ती कॉलेजमध्ये गेली होती.
भावाच्या डोळ्यादेखत बहिण गतप्राण
कॉलेजमधील कामे उरकवून घरी जाण्यासाठी आपल्या भावाला पुन्हा बोलून घेतले. मात्र त्यानंतर घरी जात असताना शिव कॉलनीवरील उड्डाणपुलाजवळ अंगावरून डंपर गेल्याने मनस्विनी जागीच गतप्राण झाली. यामध्ये भाऊ नचिकेत हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. मात्र डोळ्यात देखत आपल्या बहिणीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहताना नचिकेत प्रचंड धास्तावला होता. दोघा भावाबहिणीची ही विदारक अवस्था पाहून घटनास्थळावरील नागरिकही हळहळले.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मनस्विनीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर जखमी नचिकेतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनवणे परिवाराचा जळगाव शहरात मोठा गोतावळा असून, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक पदाधिकारी उपस्थित झाले होते.