जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. खडसे यांना सर्व पदे घरात हवी असतात, अशी टीका महाजन यांनी केली होती. त्यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. नगराध्यक्ष पद भूषविलेल्या साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे.
गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे एकनाथ खडसे यांना सर्व पदे घरात पाहिजेत, अशी टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर निशाणा साधणा साधला. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष पदावर कायम का आहेत? साधना महाजन तुमच्या कुटुंबातल्या की बाहेरच्या आहेत? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर कदाचित मुलगा राजकारणात आला असता, असं वादग्रस्त विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
दुसऱ्याला संधी का दिली नाही?
दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या गेली 25 वर्षे राजकारणात आहेत. ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्या ते नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मग गिरीश महाजन यांनी पत्नी ऐवजी दुसऱ्याला संधी का दिली नाही? असा सवालही त्यांनी केला.
भाजपमध्ये घराणेशाही
भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी असून नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीमधून आले आहेत. त्यांना हा नियम लागू नाही का? त्यामुळे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र या आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा खडसे आणि महाजनांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.