मुंबई : पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणी अलीकडेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे नुकतीच संजय राऊत यांची तुरूंगातून सुटका झाली होती. मात्र, आता पुन्हा ईडीने राऊतांना नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे. राऊत यांना 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तब्बल 100 दिवसानंतर संजय राऊत यांना बुधवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. विशेष पीएमएलए कोर्टातून संजय राऊत यांना जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
ईडीच्या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी
संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. याविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने पीएमएल न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. परंतु, पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या सुधारित याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ईडीने न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकेत न्यायालयाकडून काही चुका सांगण्यात आल्या होत्या. त्या सर्व चुका दुरुस्त करुन ईडीकडून आता मुंबई न्यायालयात सुधारित याचिका दाखल करण्यात आली आहे.