जळगाव : शिवछत्रपती हा क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्यासाठी ला.ना. हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांनी क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहिल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.
या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुख शेख यांनी या प्रकरणी सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हे आदेश दिले. बुधवारी त्याची प्रत उपलब्ध झाली आहे. सन २०१६-१७ चा क्रीडा शिक्षकांसाठी असलेला शिवछत्रपती पुरस्कार डाॅ. प्रदीप तळवेलकर यांना मिळाला आहे. त्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाबरोबर त्यांनी एकूण १६ प्रमाणपत्र जोडले होते.
बचाव पक्षाचा दावा नाकारला
प्रदीप तळवेलकर यांच्यावतीने विधिज्ञ सत्यजीत पाटील यांनी फारुख शेख यांचे म्हणणे नाकारत क्रीडा शिक्षक म्हणून बाहेर स्पर्धांसाठी गेले तरी शाळा त्यांना कामावर हजर दाखवते. याचा अर्थ ते शाळेत हजर असतात असे नाही, असा दावा केला. मात्र, न्यायालयाने तो अमान्य केला. शेख यांनी दिलेल्या ४८ नोंदीपैकी काही नोंदीत तळवेलकर हे शाळेत अनुपस्थित पण कामावर हजर अशा नोंदी आहेत. तळवेलकर यांच्यासह प्रशांत प्रभाकर जगताप, डी. पी. खिंवसरा, अशोक दुधारे, उदय डोंगरे, ए. एम. पाटील, एल. आर. मौर्य, आसिफखान अजमलखान, देवदत्त पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.