भुसावळ : अडीच वर्षांपुर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण होऊनही त्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्याचा मिळालेले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भुसावळ न्यायालय आवारात आज (दि. १७) दुपारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकरी दयाराम गोविंदा सोनसकर यांच्या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तरी देखील गेल्या अडीच वर्षापासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सुनस्कर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु ठेवला होता. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने त्यांनी भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शहर पोलीस कर्मचार्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पत्राव्दारे दिला होता इशारा
दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायाधीश यांना याआधीच पत्र दिले होते. याद्वारे त्यांनी कळविले होते की मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे भुसावळ न्यायालयाच्या आवारात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याला सरकार जबाबदार राहील असे पत्रात म्हटले होते. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी सदरील बाब भुसावळ शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सोनस्कर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे.