पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. काहीतरी किरकोळ कारणावरुन खुनाच्या घटना घडत आहेत. काल जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून स्वत:च्या आईची हत्या केली. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंडवडमध्ये एका हॉटेलमध्ये मटणाच्या सूपमध्ये भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या वेटरचे नाव मंगशे कोस्ते (वय 19, मुळ रा. जालना) असे आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी पुनीत सचदेव, विजयराज वाघेरे (रा.पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेल्या मटण सूपमध्ये भाताचे कण होता म्हणून दोघा तरुणांनी हॉटलच्या वेटरला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. या वेटरच्या मदतीसाठी आलेल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर चार कर्मचाऱ्यांना देखील या दोघा तरुणांनी मारहाण केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
पिंपळे सौदागर परिसरात सासुरवाडी नावाचे एक मटणाचे हॉटेल आहे. या ठिकाणी खानावळ देखील चालवली जाते. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी या ठिकाणी जेवायला जात होते. नेहमीप्रमाणे हे दोघे जेवणासाठी खानावळीत आले. मात्र, त्यांच्या मटणाच्या सूपमध्ये भाताचे काही कण आढलून आले. त्यामुळे आरोपी विजयराज आणि त्याच्या साथीदाराला राग अनावर झाला. त्यांनी वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
जखमी वेटरचा जागीच मृत्यू
यावेळी हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही. जेवण ही चांगले देत नाही म्हणत तिघांना त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. यात मंगेश हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र हा हॉटेलमधून पळून गेले होते. त्यांच्या मारहाणीत इतर दोन वेटर देखील जखमी झाले. जखमीवर उपचार सुरू असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने मात्र परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.