भोपाळ : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमध्ये बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. हे इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचं निनावी पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे एक पत्र इंदूरमध्ये मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञात व्यक्ती सोडून गेली. चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.
काय म्हटलंय पत्रात?
दरम्यान, येत्या 24 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये थांबणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना हे धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रामध्ये भारत जोडो यात्रा ही इंदूर येथे आल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 507 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आजच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.
भाजप-मनसेतर्फे निषेध
महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हजारो लोक स्वत:हून या रॅलीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडे तक्रारीही देत आहेत. तसेच त्यांना पाठिंबाही देत आहेत. या रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केलं आहे. सावरकर हे ब्रिटिशांची पेन्शन घेत होते. त्यांनी माफीनामा दिल्यानेच त्यांना सोडण्यात आलं, असं सांगत राहुल गांधी यांनी कागदपत्रच मीडियासमोर सादर केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजप आणि मनसेने जोरदार टीका केली आहे. मनसेने तर राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही ठिकठिकाणी आंदोलन करत राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे.