नागपूर : एका बालकाच्या अपहरणाचा तपास सुरु असताना पोलिसांकडून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालकांचे अपहरण करुन खरेदी-विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याला अटक केली असून, त्यांनी आतापर्यंत शहरातील सहा मुले विकली आहे. एवढ्यावरच हे दाम्पत्य थांबलेले नाही, तर त्यांनी स्वत: जन्माला घातलेली तीन मुले विविध ठिकाणी विकली आहेत. त्यामुळे पोलिसही सुन्न झाले.
पोलिसांनी अलीकडेच या टोळीतील योगेंद्र प्रजापती, रिता प्रजापती, सूत्रधार श्वेता रामचंद्र सावळे ऊर्फ श्वेता मकबूल खान, फरजाना ऊर्फ असार कुरैशी, सीमा परवीन अब्दुल रउफ अन्सारी, बादल धनराज मडके आणि सचिन रमेश पाटील यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुलांची डीएनए चाचणी होणार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ‘कळमन्यातील राजकुमारी निशाद हिच्या आठ महिन्यांच्या चिमुकल्यांची चोरी करणारी टोळी व प्रजापती दाम्पत्य बऱ्याच काळापासून या धंद्यात सक्रिय आहेत. ते दुसऱ्यांची मुले तर पळवितातच, शिवाय त्यांची पोटची तीन मुले त्यांनी विविध ठिकाणी विकली आहेत. प्रजापतीला पाच मुले असून त्यातील दोन भंडाऱ्यात तर एक नागपुरात विकल्याची माहिती समोर आली आहे. आता ही मुले त्यांचीच आहेत की अन्य कुणाची, यासाठी त्यांची डीएनए चाचणीसुद्धा होणार आहे.
वर्षभरात 18 ठिकाणी घेतला आश्रय
तसेच प्रजापती दाम्पत्याने वर्षभरात 18 ठिकाणी आश्रय घेतला आहे. सर्व ठिकाणच्या पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून बेपत्ता मुलांच्या प्रकरणांचा तपास करण्यास सांगितले आहे. या टोळीत कथित सामाजिक कार्यकर्त्याही सहभागी आहे. राजश्री सेन असे तिचे नाव असून तिनेसुद्धा एका नवजात बालकाची विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या बाळाची उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुटका केली आहे.
दर 10 महिन्यांनी एका मुलाला जन्म
योगेंद्र प्रजापती याची पत्नी रिटाने मार्च 2018 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. पाचव्या क्रमांकाची मुलगी जून 2022 मध्ये जन्मली आहे. 51 महिन्यांत पाच बालकांचा जन्म झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, दर 10 महिन्यांनी मुलाला जन्म देण्याच्या मुद्द्यावर पोलिसांकडून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. प्रजापती दाम्पत्यासोबत सापडलेल्या दोन मुलांच्या पालकत्वावर त्यांना शंका आहे.