अमळनेर : तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आणि या प्रकारातून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, याप्रकरणी पीडित मुलीने स्वतः फिर्याद दिली आहे. निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी ९ वीत असतांना तू मला आवडते. आपण लग्न करू दोघे पळून जाऊन असे सांगत होता. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने तू माझ्याशी प्रेमसंबंध कर अन्यथा तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी देत होता. घाबरून मुलीने हो म्हटल्यावर समाधान याने पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. हे प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर त्यांनी मुलीचा साखरपुडा २६ जुलै २०२२ रोजी करून दिला. ती १८ वर्षाची असताना लग्न करण्यात येणार होते. ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीला आणले. डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगून अवघ्या सात महिन्याची गर्भवती असताना तिची प्रसूती केली. तिने एक पुरूष जातीचे बाळास जन्म दिला आहे. पीडित तरुणीने जन्माला आलेले बाळ जवळ ठेवायचे नसल्याने बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे हे करित आहे.